पिंगुळी गोंधळपूरमध्ये लोकसहभागातून बंधारा पूर्ण

ग्रामस्थांसह शिक्षक अन् विद्यार्थ्यांचे श्रमदान.

प्रांताधिकारी सौ ऐश्वर्या काळूशे यांच्याकडून उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक.

केतन शिरोडकर /पिंगुळी

पाणी अडवा, पाणी जिरवा या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड देत पिंगुळी गोंधळपूर येथे ग्रामसहभागातून बंधाऱ्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि जलसंधारणाला चालना देण्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमात ग्रामस्थांसह शिक्षक आणि शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. समाजहिताच्या या उपक्रमात सर्वांनी दाखविलेली एकजूट आणि श्रमदानाची भावना पाहून उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी सौ. ऐश्वर्या काळूशे यांनी विशेष कौतुक केले.

पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे, भूजलपातळी वाढविणे आणि भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीने बंधाऱ्यांचे महत्त्व मोठे आहे. याच उद्देशाने गोंधळपूर येथे ग्रामस्थांनी एकत्र येत बंधारा पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला. या कामात शिक्षक आणि विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण घालून दिले.
या उपक्रमाला प्रांताधिकारी सौ. ऐश्वर्या काळूशे, तहसीलदार सचिन पाटील, निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव आणि तलाठी जितेंद्र खताडे यांची उपस्थिती लाभली.

प्रशासनाच्या उपस्थितीत ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी जलसंधारणाच्या कामात घेतलेला सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या अशा उपक्रमांमुळे गावाच्या विकासाला चालना मिळण्याबरोबरच पाणी संवर्धनाविषयी जनजागृती होण्यासही मदत होते.

यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, पिंगुळी गोंधयाळेचे मुख्याध्यापक वालावलकर सर, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक उर्दू शाळा, गोंधयाळेचे मुख्याध्यापक तौफिक अहमद रमजान पिरजादे, शिक्षण सेविका अस्मा अख्तरमियां शेख, केंद्रप्रमुख गणेश नाईक, पारकर मॅडम, माजी केंद्रप्रमुख मराठे सर आणि गोंधळपूरचे पोलीस पाटील शंकर सातार्डेकर उपस्थित होते.

तसेच जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर, ग्रामपंचायत सदस्य आयाज खुल्ली, अजय बांदेकर, मयूर खोत, प्रमोद खोत, रामदास करंगुटकर, अखलाद शेख यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला.
प्रशासन, ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या एकत्रित प्रयत्नांतून पूर्ण झालेला हा बंधारा जलसंधारणाच्या लोकचळवळीला बळ देणारा ठरला आहे. पाणी हीच जीवनाची गरज असल्याची जाणीव ठेवून गावकऱ्यांनी एकजुटीने केलेले हे काम इतर गावांसाठीही प्रेरणादायी आहे. ग्रामसहभागातून जलसंधारणाची कामे उभी राहिल्यास पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी निश्चितच मदत होऊ शकते.

error: Content is protected !!