कुडाळ : कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून ‘क’ वर्ग यात्रस्थळ कार्यक्रम २०२६ – २७ अंतर्गत बांबूळी ब्रह्मेश्वर मंदिरासाठी ५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे मंदिर परिसराच्या सुशोभिकरणाच्या कामाला वेग येणार आहे.
कुडाळ तालुक्यातील बांबुळी हे गाव निसर्गसौंदर्याने नटलेलं आहे. बांबूळीच ग्रामदैवत श्री देव ब्रम्हेश्वर मंदिर आणि मंदिराच्या बाजूलाच असणारा तलाव गावाच्या सौंदर्यात अजूनच भर टाकतो. महाशिवरात्रीनिमित्त अनेक भक्तगण या मंदिराला भेट देण्यासाठी येतात.
‘क’ वर्ग यात्रस्थळ विकास कार्यक्रमांतर्गत मंजूर झालेल्या निधीमुळे गावाच्या पर्यटनात्मक विकासाला चालना मिळणार आहे. यासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, सभापती मिलिंद नाईक, शिवसेना तालुकाप्रमुख विनायक राणे, दीपक नारकर यांचे सहकार्य लाभले. तसेच या कामासाठी विभागप्रमुख नागेश परब, शाखाप्रमुख संदीप गावडे व सिद्धेश परब यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. यासाठी ग्रामस्थांमधून समाधानाचे स्वर उमटत आहेत.