राज्यस्तरीय नवउद्योजिका पुरस्कारप्राप्त मृणाल सावंतचा कुडाळ येथे विशेष सत्कार
केतन शिरोडकर /कुडाळ
वयाच्या दहाव्या वर्षापासून नृत्यकलेची साधना करत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या मृणाल सावंत हिने नृत्यांगना ते नवउद्योजिका असा प्रेरणादायी प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला आहे. कला क्षेत्रातील यशानंतर उद्योजकतेच्या क्षेत्रातही तिने घेतलेली गरुडझेप निश्चितच कौतुकास्पद असून तिचा प्रवास नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ कुडाळचे माजी अध्यक्ष डॉ. संजय सावंत यांनी केले.
पिंगुळी येथील सिंधुरत्न प्रबोधिनी आणि कुडाळ-पिंगुळी येथील गिअर अप जिम अँड वेलनेस सेंटर यांच्या वतीने राज्यस्तरीय नवउद्योजिका पुरस्काराने सन्मानित झालेल्या मृणाल सावंत हिचा कुडाळ येथे गौरव करण्यात आला. नाशिक येथे नुकत्याच झालेल्या पुरस्कार सोहळ्यात मृणालला हा सन्मान प्रदान करण्यात आला होता. तिच्या या यशाचे कौतुक करण्यासाठी आयोजित सत्कार समारंभाला डॉ. संजय सावंत, सेवानिवृत्त शासकीय अधिकारी अनुप्रिया जाधव आणि सामाजिक कार्यकर्ते हेमंत जाधव प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. संजय सावंत म्हणाले की, मृणालने वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षापासून नृत्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गेल्या १४ वर्षांतील तिची कलाक्षेत्रातील वाटचाल अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यानंतर व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकून अवघ्या दोन वर्षांत राज्यस्तरीय नवउद्योजिका पुरस्कार मिळवणे, ही तिच्या मेहनतीची, जिद्दीची आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची पावती आहे.
सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी अनुप्रिया जाधव यांनीही मृणालच्या यशाचे कौतुक केले. कला आणि व्यवसाय या दोन्ही क्षेत्रांशी प्रामाणिक राहून तिने मिळवलेले यश निश्चितच अभिनंदनीय असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना मृणाल सावंत भावूक झाली. ती म्हणाली, “गेल्या १४ वर्षांपासून नृत्य क्षेत्रात काम करताना माझे अनेक ठिकाणी सत्कार झाले. मात्र, माझ्या कार्याची दखल घेऊन जाधव कुटुंबीयांकडून झालेला हा पहिला सत्कार माझ्यासाठी विशेष आहे. माझ्या आजवरच्या यशात अनेकांचे आशीर्वाद आणि सहकार्य लाभले आहे. कलेच्या क्षेत्रात मिळणारी शाबासकीची थाप मला नेहमीच पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देते.”
प्रास्ताविकात हेमंत जाधव यांनी मृणालच्या गेल्या १४ वर्षांतील नृत्य क्षेत्रातील वाटचालीसह उद्योजिका म्हणून तिने केलेल्या कार्याचा आढावा घेतला. आभार प्रदर्शन गिअर अप जिमचे संचालक साईराज जाधव यांनी केले.
या कार्यक्रमाला गिअर अपचे संचालक साईराज जाधव, प्रतीक्षा सावंत, पूजा जाधव, डॉ. सुविधा वाळवे, पूजा नाडकर्णी, दर्शन मयेकर, अनिकेत सावंत, योगेश घाडी, काजल जावकर, जयंत रेगे, ओंकार शिरसाठ, विनोद पिंगुळकर, निश्चय मसगे, कुणाल करनूरकर, ओंकार सावंत, राघव जाधव आदी उपस्थित होते.


Subscribe








