स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई
दीड वर्षांपासून होता फरार
सिंधुदुर्ग : चोरी, घरफोडी असे विविध गुन्हे दाखल असलेल्या सराईत आरोपीला अखेर तुळजापूर येथून ताब्यात घेण्यात आले. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या सिंधुदुर्ग शाखेने ही कारवाई केली. राहुल भोसले (२७) असे त्याचे नाव असून गेल्या दीड वर्षांपासून तो फरार होता. सावंतवाडी पोलीस ठाण्यात त्याच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राहुल सुनील भोसले (रा. धनेगाव, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) हा गुन्हा घडल्यापासून आपले अस्तित्व लपवून फिरत होता. त्यामुळे शोधकार्यात अडथळे येत होते. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे PSI हनुमंत भोसले व त्यांचे पथक सातत्याने त्याच्या मागावर होते. त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सदर आरोपी आपल्या मूळ गावी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार नमूद पथकाने दिनांक ८ ऑक्टोबर रोजी सायं. ५.४५ वाजण्याच्या सुमारास धनेगाव परिसरातून त्याचा पाठलाग करत त्याला शिताफीने ताब्यात घेतले. आरोपीकडे सदर गुन्ह्यांच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला सावंतवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
सदर आरोपीविरोधात पेडणे, गोवा पोलीस ठाणे गु.र.नं. 45/2025
भा.न्या.संहिता 2023 चे कलम 109 अंतर्गत खुनाचा प्रयत्न, पेडणे, गोवा पोलीस ठाणे गु.र.नं. 46/2025
भा.न्या.संहिता 2023 चे कलम 303(2) अंतर्गत वाहन चोरी, ओल्ड गोवा पोलीस ठाणे गु.र.नं. 97/2025
भा.न्या.संहिता 2023 चे कलम 331(2), 331(4), 305, 3(5) अंतर्गत घरफोडी असे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई मा. श्री. मोहन दहिकर, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग व मा. कु. नयोमी साटम, अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांच्या सूचनेनुसार तसेच पोलीस निरीक्षक श्री. प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे PSI हनुमंत भोसले, HC/1019 ओटववणेकर, PC/598 अमर कांडर व PC/1017 समजिस्कर यांच्या पथकाने सहभाग घेतला.


Subscribe







