आगीत सर्वस्व गमावलेल्या संजय सावंतांना मेकॅनिक असोसिएशनचा आधार!
गॅरेज व्यवसाय पुन्हा उभा करण्यासाठी कुडाळ तालुका टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनकडून आर्थिक मदत
कुडाळ : प्रतिनिधी
अचानक लागलेल्या आगीत गॅरेजमधील सर्व साहित्य जळून खाक झाल्याने मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या संजय सावंत यांच्या मदतीला आता त्यांच्या गॅरेज व्यवसायातील बांधव धावून आले आहेत. कुडाळ तालुका टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनने सामाजिक बांधिलकी जपत संजय सावंत यांना आर्थिक मदतीचा हात दिला.
गॅरेजला लागलेल्या आगीत संजय सावंत यांचे मोठे नुकसान झाले. मेहनतीने उभा केलेला व्यवसाय क्षणात उद्ध्वस्त झाल्याने त्यांच्यासमोर पुन्हा गॅरेज उभे करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते.
या कठीण प्रसंगी “एक गॅरेज व्यावसायिक म्हणून तो पुन्हा उभा राहिला पाहिजे, त्याचा व्यवसाय पुन्हा सुरळीत झाला पाहिजे आणि त्याने नव्या जोमाने कामाला सुरुवात केली पाहिजे,” या भावनेतून कुडाळ तालुका टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनने आपल्यापरीने आर्थिक मदत जमा करून ती संजय सावंत यांच्याकडे सुपूर्त केली.
मदतीचा हात स्वीकारताना संजय सावंत यांचे डोळे पाणावले. संकटाच्या काळात आपल्या व्यवसायातील बांधवांनी दिलेला आधार पाहून त्यांच्या भावनांना बांध फुटला. संकट कितीही मोठे असो, आपली माणसं सोबत असतील तर पुन्हा उभं राहण्याचं बळ मिळतं, याचीच प्रचिती या मदतीतून आली.
कुडाळ तालुका टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, व्यावसायिक बांधवांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची ही भावना समाजासाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
यावेळी उपस्थित कुडाळ तालुका टू व्हिलर मेकॅनिक असोसिएशनचे अध्यक्ष संदीप तेंडोलकर सचिव गुरुनाथ धुरी, सागर तुळसकर,मोहित मेथर, घनश्याम वांगणकर शहर कमिटी अध्यक्ष दिवाकर मांजेकर, संजय धुरी, शंकर सातार्डेकर, दर्शन शेलटे, राजु कुडाळकर, दादा दळवी आदि सर्व उपस्थित होते.


Subscribe







