दुकानाच्या वादातून २३ वर्षीय तरुणाचा खून;

मृतदेह सावंतवाडीत फेकला

सावंतवाडी : दुकान सुरू करण्याच्या वादातून गोव्यात एका २३ वर्षीय तरुणाची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह गाडीतून सावंतवाडी तालुक्यातील निरवडे-नमसवाडी येथील निर्जन रस्त्यावर आणून फेकून देण्यात आला. या प्रकरणाचा अवघ्या काही तासांत छडा लावत सावंतवाडी पोलिसांनी मुख्य संशयित हॉटेल मालकासह दोघांना ओल्ड गोवा येथून ताब्यात घेतले आहे.

आजिम खान (वय २३, मूळ रा. बहराइच, उत्तर प्रदेश; सध्या रा. ओल्ड गोवा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकासमोरील हॉटेल कोकण क्राऊनलगतच्या रस्त्यावर स्थानिक ग्रामस्थांना एका तरुणाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. ग्रामस्थांनी तातडीने पोलीस पाटील तसेच पोलिसांना याची माहिती दिली.

माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची पाहणी केली. मृतदेहाजवळ आढळलेल्या बॅगेतील ओळखपत्र व कागदपत्रांच्या आधारे मृताची ओळख पटविण्यात आली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदनादरम्यान पोटावर झालेल्या गंभीर मारहाणीमुळे आजिमचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

आजिम खान हा गेल्या तीन वर्षांपासून ओल्ड गोवा येथील एका हॉटेलमध्ये शॉर्मा बनविण्याचे काम करत होता. हॉटेल मालकाचा मेहुणा आणि आजिम हे दोघे मिळून स्वतंत्र शॉर्मा सेंटर सुरू करण्याच्या तयारीत होते. यावरून हॉटेल मालक दीपराज गोवेकर याच्या मनात राग होता, अशी माहिती तपासातून समोर आली आहे.

मंगळवारी दुपारी दीपराज गोवेकर याने आजिमला ओल्ड गोवा येथे बोलावून घेतले. त्यानंतर साथीदाराच्या मदतीने त्याला बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. मारहाण सुरू असताना आजिमने पुण्यातील आपल्या भावाला फोन करून मदतीचा प्रयत्न केला. मात्र, हल्लेखोरांनी त्याचा मोबाईल हिसकावून घेतल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. गंभीर मारहाणीमुळे आजिमचा मृत्यू झाला.

यानंतर संशयितांनी मृतदेह गाडीत घातला आणि गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तो सावंतवाडी जवळील निरवडे-नमसवाडी येथील निर्जन रस्त्यावर आणून टाकला. त्यानंतर संशयितांनी तेथून पलायन केले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी ओल्ड गोवा येथे छापा टाकून हॉटेल मालक दीपराज गोवेकर याच्यासह त्याच्या एका साथीदाराला ताब्यात घेतले.

मयत आजिमचा मेहुणा कासिम महंमद याने दिलेल्या तक्रारीवरून सावंतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. खुनाची घटना गोवा हद्दीत घडल्याने हा गुन्हा शून्य नंबरने (झिरो एफआयआर) नोंदविण्यात आला असून पुढील कारवाईसाठी तो ओल्ड गोवा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास ओल्ड गोवा पोलीस करत असून हत्येमागील नेमके कारण, घटनेतील इतर व्यक्तींचा सहभाग आणि मृतदेह सावंतवाडीपर्यंत आणण्यामागील संपूर्ण घटनाक्रम याबाबत अधिक तपास सुरू आहे.

error: Content is protected !!