व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत केले ब्लॅकमेल
चौघांविरोधात गुन्हा दाखल
वैभववाडी : विवाहित महिलेवर अत्याचार केल्याचा तसेच त्याचे व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केल्याचा आरोप करत खांबाळे येथील चौघांविरोधात वैभववाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रांत पवार (२३), परेश साईल (२५), तुषार कर्पे (२५) आणि अक्षय चव्हाण (२७) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी चौघांनाही अटक केली असून, त्यांना आज (ता. ७) सायंकाळी न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेने दाखल केलेल्या फिर्यादीत संशयितांनी तिला शीतपेय दिल्याचे नमूद केले आहे. ते प्यायल्यानंतर तिचे डोके जड झाल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून त्याचे व्हिडिओ तयार करण्यात आल्याचा आरोप महिलेने केला आहे.
तसेच हे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देत आपल्यावर वारंवार अत्याचार करण्यात आल्याचे महिलेने फिर्यादीत नमूद केले आहे. मार्च ते सप्टेंबर या कालावधीत हा प्रकार सुरू असल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकाराला कंटाळून संबंधित महिलेने मंगळवारी रात्री उशिरा वैभववाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी विक्रांत पवार, परेश साईल आणि अक्षय चव्हाण या तिघांना मंगळवारी रात्री उशिरा अटक केली, तर तुषार कर्पे याला बुधवारी सकाळी अटक करण्यात आली.
अटक केलेल्या चौघांना आज (ता. ७) सायंकाळी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


Subscribe







