जमीन मालकाकडून दोन महिन्यांची मुदतवाढ
नगराध्यक्षांची यशस्वी शिष्टाई
प्रसाद कुंटे यांचे लाभले विशेष सहकार्य
कुडाळ : सांगिर्डेवाडी येथील कचरा डेपोच्या वापरावरून सुरू असलेल्या प्रश्नाला तूर्तास दिलासा मिळाला आहे. जमीन मालक श्री. नारायण वसंत राऊळ यांनी सार्वजनिक आरोग्याचा विचार करून आपल्या जागेचा वापर आणखी दोन महिन्यांसाठी करण्यास परवानगी दिली आहे.
याबाबत श्री. राऊळ यांनी कुडाळ नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी पत्र दिले असून, त्याची आवक क्र. २४०८ आहे. या पत्रानुसार एम.आय.डी.सी. येथील मुख्य घनकचरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होईपर्यंत, तात्पुरती व्यवस्था म्हणून उत्कर्ष नगर येथील प्रकल्पासाठी त्यांच्या जागेचा वापर दि. ७ ऑक्टोबर २०२६ पासून पुढील दोन महिन्यांसाठी करता येणार आहे.
दरम्यान, यासंदर्भात झालेल्या चर्चेत नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर, नगरसेविका नयना मांजरेकर, कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी (CO) तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
नगरपंचायतीकडून ओला व सुका कचरा वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी जागेची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले होते. सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन जमीन मालकाने नगरपंचायतीच्या विनंतीला सहानुभूतीपूर्वक प्रतिसाद देत दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. यासाठी प्रसाद कुंटे यांचे विशेष सहकार्य लाभले.
दरम्यान, एम.आय.डी.सी. येथील मुख्य घनकचरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होईपर्यंतच ही तात्पुरती व्यवस्था राहणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे कुडाळ शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न तूर्तास दोन महिन्यांसाठी मार्गी लागला असून, आता मुख्य प्रकल्प लवकर कार्यान्वित होण्याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


Subscribe








