पिंगुळी शेटकरवाडीत ग्रामएकजुटीचा जलसंवर्धनाचा आदर्श

महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाचे प्रांताधिकाऱ्यांकडून कौतुक

केतन शिरोडकर/पिंगुळी

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शेटकरवाडी ग्रामस्थांनी एकजुटीने सुरू केलेल्या जलसंवर्धनाच्या उपक्रमाला मोठे यश मिळाले आहे. ग्राम सहभाग आणि श्रमदानातून शेटकरवाडीत तिसरा वनराई बंधारा पूर्ण करण्यात आला. ग्रामस्थांनी एकत्र येत दाखविलेल्या या कृतीशील एकजुटीमुळे परिसरात पाणी अडविणे व पाणी जमिनीत जिरविण्याच्या प्रयत्नांना मोठी चालना मिळणार आहे.
वनराई बंधाऱ्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी (प्रांत) सौ. ऐश्वर्या काळूशे यांनी शेटकरवाडीला भेट दिली. यावेळी नायब तहसीलदार श्री. नागेश शिंदे, निवासी नायब तहसीलदार श्री. अमरसिंह जाधव आणि तलाठी कु. तनुजा बिरादार उपस्थित होते.
या उपक्रमात महिलांनीही मोठ्या उत्साहाने सहभागी होत श्रमदान केले. गावातील महिला आणि पुरुष ग्रामस्थांनी एकत्रितपणे पुढाकार घेतल्याचे पाहून प्रांताधिकारी सौ. ऐश्वर्या काळूशे यांनी महिलांच्या विशेष सहभागाचे तसेच शेटकरवाडी ग्रामस्थांनी दाखवलेल्या एकीचे मनापासून कौतुक केले.

यावेळी पोलिस पाटील सतीश माडये, ग्रामपंचायत सदस्य श्री. महेश पालकर, सौ. नूतन गावडे, वैभव धुरी, सुनील पालव, प्रसाद दळवी यांच्यासह सुमारे ८० ग्रामस्थ उपस्थित होते.

‘गावासाठी एकत्र आलो, तर पाण्याचा प्रश्नही सोडवू शकतो’ या भावनेतून शेटकरवाडी ग्रामस्थांनी उभारलेला हा तिसरा वनराई बंधारा केवळ जलसंवर्धनाचे काम नसून ग्रामएकजुटीचे आणि लोकसहभागाचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.

error: Content is protected !!