राज्यपंच जनार्दन उर्फ राजू बंगे यांची सामनाधिकारी म्हणून निवड
कुडाळ : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने पालघर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ५३ व्या कुमार-कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र, लक्ष्मीनारायण वालावल कबड्डी संघाचे माजी खेळाडू तथा राज्यपंच जनार्दन उर्फ राजू बंगे यांची सामनाधिकारी म्हणून निवड झाली आहे.
कबड्डी क्षेत्रात आपल्या उत्कृष्ट खेळाडूवृत्तीबरोबरच पंच म्हणूनही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राजू बंगे यांच्या या निवडीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कबड्डी क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. ग्रामीण भागातून पुढे येत त्यांनी कबड्डीच्या मैदानावर खेळाडू म्हणून योगदान दिल्यानंतर आता राज्यस्तरीय स्पर्धेत सामनाधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारण्याचा बहुमान मिळविला आहे.
पालघर येथे होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय स्पर्धेत त्यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी ही त्यांच्या कार्याची आणि पंच म्हणून असलेल्या कौशल्याची पावती मानली जात आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी, कबड्डीपटू, प्रशिक्षक, पंच तसेच लक्ष्मीनारायण वालावल कबड्डी संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
“सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सुपुत्र म्हणून राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत सामनाधिकारी म्हणून मिळालेला हा सन्मान जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे,” अशा भावना क्रीडाप्रेमींनी व्यक्त केल्या असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.


Subscribe







