घातपाताचा संशय
बांदा : इन्सुली-डोबाशेळ परिसरातील तिलारी कालव्यात एका अनोळखी वृद्ध पुरुषाचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत गोधडीमध्ये आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेहाची स्थिती संशयास्पद असल्याने ग्रामस्थांकडून घातपाताची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, संबंधित व्यक्ती कालव्यात स्वतः पडली असावी आणि त्यातून झालेल्या दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाला असण्याची शक्यता पोलिसांनी प्राथमिक तपासात व्यक्त केली आहे.

कालव्यातील पाण्यात मृतदेह तरंगताना स्थानिकांच्या निदर्शनास आला. त्यानंतर ग्रामस्थांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह बाहेर काढत पंचनामा केला. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, त्याबाबत पोलिसांकडून माहिती घेण्याचे काम सुरू आहे.
मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळल्याने तसेच त्याच्यासोबत गोधडी आढळून आल्याने घटनेबाबत विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. अज्ञात व्यक्तींनी अन्यत्र काही प्रकार करून मृतदेह कालव्यात टाकला असावा, अशी शक्यताही ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पोलिसांच्या प्राथमिक निरीक्षणानुसार हा घातपाताचा प्रकार नसण्याची शक्यता आहे. संबंधित व्यक्ती कालव्याच्या परिसरात मद्यप्राशन करण्यासाठी बसली असावी आणि त्या अवस्थेत ती कालव्यात पडली असावी. पडल्यामुळे शरीरावर जखमा झाल्या असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
मात्र मृतदेहाची अर्धनग्न अवस्था आणि त्याच्यासोबत आढळलेली गोधडी यामुळे संशय कायम आहे. त्यामुळे या मृत्यूमागील नेमके कारण काय, हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


Subscribe







