गुरुवर्य पंडित डॉक्टर सुधांशू कुलकर्णी शिष्य परिवार आणि आदित्य आचरेकर संचालीत नाद म्युझिक अकॅडमी यांच्या संयुक्त आयोजनातून गुरुवंदना कार्यक्रम संपन्न

कुडाळ : गुरुवर्य पंडित डॉक्टर सुधांशू कुलकर्णी शिष्य परिवार आणि आदित्य आचरेकर संचालीत नाद म्युझिक अकॅडमी यांच्या संयुक्त आयोजनातून 27 जुलै 2025 रोजी गुरुवंदना हा कार्यक्रम कुडाळ मराठा समाज हॉल येथे पार पडला.

गुरुवर्य कुलकर्णी सर यांच्या सोबतच कार्यक्रमाला कुडाळचे माननीय तहसीलदार श्री वीरसिंग वसावे साहेब यांनी वेळात वेळ काढून प्रमुख उपस्थिती दर्शवली. दैनंदिन जीवनातील शास्त्रीय संगीताचे महत्त्व आणि नवीन पिढीला संगीताची असणारी आवश्यकता याविषयी या कलाकारांनी घेतलेल्या या कार्यक्रमाचे त्यांनी कौतुक केले.

सकाळच्या पहिल्या सत्रात गुरुवर्य कुलकर्णी सर यांचा शिष्यवर्ग आणि नाद म्युझिक अकॅडमी यांनी हार्मोनियम कार्यशाळेचे आयोजन केले होते. ज्यामध्ये तब्बल 42 जणांना एकत्रित हार्मोनियम वादनाचे पंडित कुलकर्णी सर यांच्याकडून बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.

अगदी लहान पासून मोठ्या पर्यंत सर्वांनी हजेरी लावलेल्या या कार्यशाळेच्या शेवटी सर्वांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
गुरुवंदना कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात गुरुजींच्या गोवा येथील शिष्यांनी आपले हार्मोनियम एकल वादन सादर केले. ज्यामध्ये श्री चारुदत्त गवस, श्री पंकज सायनेकर, श्री मेधज डेंपो, श्री दिगज बेणे, श्री शेखर नागडे, श्री सोहम बाक्रे यांचे हार्मोनियम वादन तर श्री नरेश मडगावकर यांचे संतूर वादन याने सर्व श्रोतेजन भारावून गेले. यांना श्री रुद्राक्ष वझे आणि श्री उत्पल सायनेकर यांची अतिशय सुंदर अशी तबलासात लाभली. या सर्वांसोबतच पंडित कैवल्य कुमार गुरव यांचे शिष्य पंडित रोहित कुमार फाटक (कोल्हापूर) यांचे शास्त्रीय गायन सादर झाले .त्यांना श्री रुद्राक्ष वझे आणि श्री आदित्य आचरेकर यांनी साथ केली. त्याचाही उपस्थित श्रोत्यांना लाभ घेता आला.

त्यानंतर गुरुवर्य पंडित डॉ. सुधांशू कुलकर्णी यांचे गुरुपूजन त्यांच्या कुडाळ येथील शिष्य श्री आदित्य आचरेकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी गुरुजींच्या एकल वादनाने एकच रंगत आणली. त्यांना श्री अनय घाटे यांची हार्मोनियम साथ तर श्री उत्पल सायनेकर यांची तबलासाथ मिळाली. या तीनही वाद्यांच्या अप्रतिम जोडीतून एक न भूतो न भविष्यती असा अनुभव उपस्थित सर्वांना घेता आला. गुरुजींच्या वादनाने सर्व रसिक अतिशय भारावून गेले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी सुखी सामंत अतिशय उत्कृष्टरित्या सांभाळले. कार्यक्रमासाठी ध्वनी संयोजन सर्वेश पिंगुळकर यांनी पाहिले. संपूर्ण कार्यक्रमाची फोटो आणि व्हिडिओग्राफी गुरुजींचे ज्येष्ठ शिष्य श्री शेखर नागडे सर यांनी सांभाळले.

कार्यक्रमासाठी उत्तम अशी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजकांनी मराठा समाज हॉल च्या कार्यकारणीचे आभार मानले. कार्यक्रमातील सहभागी कलाकारांनी आणि गुरुजींनी आपल्या या शिष्य परिवाराने ही गुरुवंदना साजरी केल्याबद्दल कौतुक केले आणि या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल श्री. आदित्य आचरेकर यांच्या नाद म्युझिक अकॅडमीचे आणि त्याच्या कलाकारांचे देखील कौतुक केले.

error: Content is protected !!