पाण्याची टाकी साफ करताना गांधीलमाशांचा हल्ला

महेश साळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू

मालवण : घरासमोरील पाण्याची टाकी साफ करत असताना गांधीलमाशांनी केलेल्या अचानक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या साळकरवाडी येथील वाचनालय कर्मचारी महेश बळीराम साळकर (३८) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने साळकरवाडी तसेच कांदळगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महेश साळकर हे घरासमोरील जमिनीतील पाण्याची टाकी साफ करत होते. यावेळी त्यांचे चुलत भाऊ जयवंत साळकर तसेच शेजारी संजय साळकर आणि संतोष साळकर हेही मदतीसाठी उपस्थित होते. टाकी साफ करण्याचे काम सुरू असताना जवळील गांधीलमाशांच्या पोळ्यावर पाणी गेल्याने माशा बिथरल्या आणि त्यांनी चौघांवर हल्ला केला.

महेश हे त्यावेळी टाकीच्या आत उतरून काम करत असल्याने त्यांना तातडीने बाहेर पडता आले नाही. त्यामुळे त्यांच्या अंगावर मोठ्या प्रमाणात दंश झाले. या हल्ल्यात इतर तिघेही किरकोळ जखमी झाले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थ सुशांत सुर्वे यांनी सर्व जखमींना दुपारी साडेचार ते पाचच्या सुमारास मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर इतर तिघांना किरकोळ दुखापती असल्याने उपचार करण्यात आले, तर महेश यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू ठेवण्यात आले. प्रकृती स्थिर वाटल्याने रात्री सुमारे ८ वाजता त्यांना घरी सोडण्यात आले.

मात्र, मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास शौचालयातून परतल्यानंतर महेश यांची प्रकृती अचानक गंभीर झाली. परिस्थिती लक्षात घेऊन सुशांत सुर्वे यांनी त्यांना पुन्हा ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

महेश साळकर हे शांत आणि मनमिळाऊ स्वभावाचे असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यांच्या पश्चात वृद्ध वडील बळीराम साळकर, भाऊ विजय साळकर आणि विवाहित बहीण मंगल साळकर असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने साळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!